औरंगाबाद – वाळूज परिसरातील पाच मेडिकल, ज्वेलरी शॉपसह दहा दुकाने फोडणारी टोळी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जेरबंद केली आहे. यात एक अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. १६ आणि २० नोव्हेंबर रोजी वाळूज आणि रांजणगाव येथील पाच मेडिकल आणि ज्वेलरी शॉपसह दहा दुकाने फोडून आरोपींनी महागड्या वस्तूंसह रोख रकमेवर डल्ला मारला होता. वाळूज पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपी आणि एका अल्पवयीनकडून २९ हजार रुपये रोख आणि मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहेे.
तीन दिवसांत असे पकडले आरोपी
वाळूज, रांजणगाव परिसरात दोन दिवसांत दहा दुकाने फोडून चोरांनी धुमाकूळ घातला होता. चोरीच्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती, त्यासोबतच पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत दुकाने फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेेत.
एमआयडीसी वाळूज पोलिस स्टेशनचे पोलिस
निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले, की १६ आणि २० नोव्हेंबर रोजी दुकाने
फोडण्यात आली. त्यानंतर १७ आणि २१ नोव्हेंबर रोजी रांजणगाव परिसरातील सर्व
सीसीटीव्हींचे फुटेज तपासण्यात आले. यात काही मोटरसायकल चालकांच्या हलचाली
संशयास्पद वाटत होत्या. त्यासोबतच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची शरीरयष्टी, आणि वर्णन जुळत असलेल्या आरोपींवर
लक्ष केंद्रीत करण्यात आले. यांचा शोध घेऊन शुक्रवारी गंगापूर तालुक्यातील टोकी
येथून तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यातील एकजण हा अल्पवयीन आहे. आरोपींनी सुरुवातीला नकार दिला मात्र जेव्हा पोलिसी खाक्या दाखवण्यात आला तेव्हा त्यांनी दुकाने फोडल्याचे कबूल केले असून त्यांचे
काही साथीदार फरार असल्याचेही त्यांनी चौकशीत सांगितले.
२९ हजार रुपये रोख आणि मुद्देमाल जप्त
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये गणेश दिलिप
पिंपळे (२६) आणि प्रदीप दिलिप पिंपळे आणि एक अल्पवयीन आरोपी हे तिघेही गंगापूर
तालुक्यातील टोकी येथील रहिवासी आहेत. यांच्याकडून २९ हजार १४३ रुपये रोख आणि
मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात ३९० ग्रॅम चांदीचे दागिने, महागडे मोबाईल,
महागडी सौंदर्य प्रसाधने यांचा समावेश आहे.
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तीन दिवसांत टोळीला
जेरबंद केले आहे. या चोरांकडून अजून काही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता
असल्याचे पोलिस निरीक्षक साबळे यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक साबळे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे, पोलिस हवालदार वसंत शेळके, पोलिस
कर्मचारी फकीरचंद फडे, प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, शैलेंद्र अडियाल, एस. पी.
कोलीम, बंडू गोरे, बाळासाहेब आंधळे यांनी ही कारवाई केली.










